वालंबा शासकीय अनुदानित आश्रमशाळा येथील विद्यार्थ्याचा शाळेसमोरील रस्त्यावर दुचाकीने जबर धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना काल (ता.२१) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
सद्यःस्थितीत स्थित असलेल्या देव मोगरा पुनर्वसन गावाजवळ अतिदुर्गम भागातील वालंबा येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळा स्थलांतरित झाली आहे. या आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा मु.सेलगदा (ता. धडगाव) येथील विद्यार्थी मदन रमेश पाडवी (वय ९) हा २० डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आपले जेवण आटोपून जवळील रस्त्यावर पायी जात असताना अक्कलकुवाकडून भरधाव वेगात येणारी दुचाकी (क्रमांक एम एच ३९ ए एल ३२८२) वरील स्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकी (एम एच ३९ पी २७५३) हिला ठोस दिली. यात रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यावर दुचाकी धडकून तो जखमी झाला.
विद्यार्थ्याला अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याच्या मृत्यू झाला. विद्यार्थ्यांचे विच्छेदन अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मयत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रमशाळा प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आपल्या मुलाच्या मृतदेह अंतिमविधीसाठी घेण्यास नकार दिला.
पालकांची समजूत काढून संध्याकाळी साडेपाचवाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. वडील रमेश सिंगा पाडवी यांचा एकुलता एक मुलगा असल्याने मुलाच्या अचानकपणे अपघाती मृत्यू झाल्याने पालकांनी हंबरडा फोडला होता. अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार जितेंद्र महाजन तपास करीत आहेत.
0 Comments