गॅसच्या ओट्याखालून तीन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त

 


अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका रहिवाशाकडून तीन पिस्तूल व आठ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत

अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ३ डिसेंबरच्या रात्री ही मोठी कारवाई केली. आरोपीने स्वत:च्या घरातील स्वयंपाकगृहात गॅस ओट्याच्या खाली सिमेंटची एक शेगडी तयार केली होती. त्यात ही पिस्तुले आणि काडतुसे दडविण्यात आली होती.

अंजनगाव सुर्जी येथून जवळच असलेल्या लखाड या गावातील मोहम्मद नवेद ऊर्फ गुड्डू अब्दुल सलीम (३०) ही व्यक्ती मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून जिल्ह्यात विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या मागावर पोलीस बरेच दिवसांपासून होते. अखेर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे, ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात अंजनगाव सुर्जी पोलिसांनी ३ डिसेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास मोहम्मद नवेदच्या घरावर धाड टाकली. घराची झाडाझडती घेतली असता, किचनमध्ये गॅस ओट्याखाली शेगडीच्या आतमध्ये तीन गावठी पिस्तूल व त्यामध्ये आठ जिवंत नऊ एमएम काडतूस मिळून आले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहम्मद नवेद याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments