झटपट श्रीमंतीच्या लालसेने तरुणाची सहा लाखांची फसवणुक

 



झटपट श्रीमंत होण्याची लालसा डोंबिवली जवळील नांदिवली भोपरमधील एका तरुणाला चांगलीच महागात पडली. या तरुणाने युट्युबवरील दृश्यचित्रफितींना पसंती दिली. या पसंतीमधून तरुण त्या मोहात फसत गेला आणि त्याने जवळील सहा लाख ६४ हजाराची आपली कमाई वाढीव परतावा मिळेल या आशेने भामट्यांच्या स्वाधीन केली.

नांदिवली भोपर गावात जनिल अनिल सेठ (२५) हा तरुण कुटुंबासह राहतो. गेल्या आठवड्यात तो दुपारच्या वेळेत आपला मोबाईल हाताळत होता. याचवेळी त्याला एक व्हाॅट्सप वरुन संपर्क करण्यात आला. समोरील व्यक्तिने मी सेलेस्टीन बोलते. तुम्हाला झटपट पैसे पाहिजे असतील तर तुम्ही मी एक दृश्यचित्रफितीची जुळणी पाठविते त्याला तुम्ही तात्काळ पसंती द्या म्हणजे मी पुढील प्रक्रिया झटपट करते. या माध्यमातून तुम्हाला वाढीव परतावा मिळेल. बसल्या जागीच वाढीव पैसे मिळतात म्हणून जनिलने कूटचलनाच्या एका जुळणीला पसंती दिली. या जुळणीच्या माध्यमातून सेलेस्टीन भामट्याने कुटचलनावर पैसे लावण्यास सांगितले. जेवढे पैसे अधिक तेवढा परतावा जास्त असे जनिलाला सांगण्यात आले.

वाढीव परताव्याच्या अपेक्षेने जनिलने जवळील सहा लाख ६४ हजार रुपये विविध टप्प्यांमध्ये सेलेस्टीनला बँक खाते, ऑनलाईन माध्यमातून पाठवून दिले. वाढीव परतावा मिळेल म्हणून जनिल वाट पाहत राहिला. आठवडा उलटला तरी त्याला कोणीही संपर्क केला नाही. ज्या व्यक्तीने संपर्क केला होता त्या व्यक्तीचा मोबाईल बंद दिसून येऊ लागला. वाढीव परताव्याच्या बोलीने आपली फसवणूक भामट्यांनी केली आहे याची जाणीव झाल्यावर जनिलने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments