कार चालकाने सायकलला धडक दिली , विद्यार्थ्याला 1 किमी फरफटत नेलं

 


दील्लीप्रमाणेच उत्तर प्रदेशातील हरदोईमध्येही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सायकलने क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्याला एका कार चालकाने धडक दिली आणि अपघातानंतर कार विद्यार्थ्याला जवळपास एक किलोमीटर फरफटत घेऊन गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कार बाजारपेठेत आल्यानंतर स्थानिक लोकांनी गाडी थांबवली. यानंतर विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आले. स्थानिक लोकांनी गाडीची तोडफोड केली. तसेच चालकाला बेदम मारहाण केली.

पोलिसांना माहिती मिळताच कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर जखमी विद्यार्थ्याला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोतवालीच्या झाबरा पूर्वा परिसरात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या हरिनाम यांचा 15 वर्षीय मुलगा केतन हा नववीमध्ये शिकत आहे. शुक्रवारी सायंकाळी तो सायकलवरून कोचिंगला जात होता.

रस्त्यात सोल्जर बोर्ड चौकात भरधाव वेगात आलेल्या कारने त्याच्या सायकलला धडक दिली. याच दरम्यान सायकल पडली आणि केतनचा पाय गाडीत अडकला. विद्यार्थ्याचा पाय कारमध्ये अडकल्याचे पाहून स्थानिक लोकांनी कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणाने भरधाव वेगाने कार चालवली. विद्यार्थ्याला जवळपास एक किलोमीटर ओढत नेल्यानंतर गाडी बाजारात भागात पोहोचली. तिथे स्थानिक लोकांनी गाडी थांबवली. यानंतर विद्यार्थ्याला बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी कार चालक जितेंद्र शुक्लाला पकडून बेदम मारहाण केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार चालकाची लोकांच्या तावडीतून सुटका करून त्याला ताब्यात घेतले. त्याचवेळी जखमी विद्यार्थी केतनला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

Post a Comment

0 Comments