घराजवळ लघुशंका केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाचा काँक्रिट रस्त्यावर डोके आपटून खून झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. १०) रात्री शहरातील मराठे गल्ली भागात घडली.
रामभाऊ भगवान माळी (वय ३६, रा. मराठे गल्ली, शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान डोक्याला गंभीर इजा झालेल्या स्थितीत त्याला चुलतभाऊ नरेंद्र रघुनाथ माळी याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रारंभी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, बुधवारी (ता. ११) ज्ञानेश्वर बळिराम रोकडे (२६) याने फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. फिर्यादीत म्हटल्यानुसार, ज्ञानेश्वरला मंगळवारी रात्री रामभाऊ माळी याच्या घरी जेवण असल्याने तो घराकडे जात होता.
त्या वेळी मराठे गल्लीतील सार्वजनिक शौचालयाजवळ रामभाऊ माळी यांना संशयित मनोज भगवान मराठे (रा. ईदगाहनगर, शिरपूर) मारहाण करताना दिसून आला. ज्ञानेश्वर दोघांचे भांडण सोडविण्यासाठी जाईपर्यंत मनोजने रामभाऊचे डोके काँक्रिटच्या रस्त्यावर आपटले होते. तसेच मारण्यासाठी हातात दगड उचलला.
ज्ञानेश्वर व परिसरातील लोकांनी त्याला बाजूला केल्यावर दगड टाकून तो पळून गेला. रामभाऊच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामभाऊ माळीच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाबाहेर मनोज मराठे लघुशंका करीत होता. त्याला रामभाऊने हटकले. त्याचा राग आल्याने संशयित मनोज मराठे याने त्याचा खून केला. संशयिताला पोलिसांनी अटक केली.
0 Comments