देवदर्शनासाठी गेलेल्या 10 जणांवर काळाचा घाला

 


शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मोरीवली गावातील मंडळी गुरुवारी रात्री मोठ्या आनंदात निघाली. शुक्रवारची पहाट उगवत नाही तोच गावकऱ्यांचे फोन खणाणले.

देव दर्शनाला गेलेल्या बसचा अपघात झाला असून 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची वार्ता गावभर पसरली आणि गाव शोक सागरात बुडाले. मोरीवली गावाच्या चावडीवर सतत वर्दळ असायची शुक्रवारी मात्र ही चावडी सामसूम होती. गावातील मंडळी आपले नातेवाईक सुखी आहेत ना याची खातरजमा करून नंतर गावकरी अपघातस्थळी रवाना झाले.

अंबरनाथ मधील मोरीवली हे जवळपास 4 ते 5 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाच्या चारही बाजूने कारखाने असून अंबरनाथ, डोंबिवली एमआयडीसी मध्ये काम करणारे कामगार या मोरीवली गावात स्थायिक झाले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याच गावात महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनी असून या कंपनीचे मालक हे गेल्या 30 वर्षांपासून भाविकांसाठी शिर्डी साईबाबा देवदर्शन यात्रेचे आयोजन करतात.

गेल्यावर्षी या गावातून 5 बस शिर्डीला गेल्या होत्या. यावर्षी गावातून तब्बल 15 बस शिर्डीला रवाना झाल्या. कंपनीचे पॅकेजिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच घरगुती पॅकेजिंगचे काम करणाऱ्या महिलांना वर्करना या दर्शनाचे फ्री पास देण्यात आले होते. फ्री पास मिळाल्याने महिलांनी घरच्यांकडे देव दर्शनाला जाण्याचे हट्ट धरले. गावातून तब्बल 700 च्या आसपास नागरिक शिर्डीला जाण्यास तयार झाले.

गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास बस गावातून शिर्डीला जाण्यास रवाना झाल्या. अनेक घरातील संपूर्ण कुटुंबच दर्शनाला गेल्याने घरांना टाळे होते, तर कोणाच्या घरी म्हातारे आई वडील होते.गावकरी दर्शनाला गेले असून शुक्रवारी रात्री ते परततील या विचारात असतानाच गावातील अनेकांचे फोन सकाळी 7.30 च्या दरम्यान खणानु लागले. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या एका बसचा अपघात झाल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.

नातेवाईकांनी आपापल्या घरच्यांना फोन करून नक्की काय झाले याची माहिती घेऊ लागले. गावातील उबाळे कुटुंबातील नरेश व वैशाली यांचा यात मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत. तर सुहास बारस्कर यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी श्रद्धा व 4 वर्षीय श्रावणी या मायलेकींचा मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. गावातील 8 जणांवर काळाने एकाच दिवशी घाला घातला.कल्याण मधील चिंचपाडा परिसरात राहणारी दिशा गोंधळी (वय 18) हीची काकी मोरीवली गावात राहण्यास आहे. काकी देवदर्शनाला जाणार असल्याने ती काकीसोबत जाण्यासाठी गावात आली होती.

तर प्रमिला गोंधळी (वय 45) या रायगड येथे राहण्यास असून त्या आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या.चहा पानासाठी रात्री बस थांबली असता काही भाविक हे ओळखीच्या लोकांसोबत प्रवास करता यावा म्हणून अपघात झालेल्या बस मध्ये येऊन बसले आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला.

तर काही जण आपण बस बदली केल्याने वाचलो देवाची कृपा होती म्हणून हे घडून आले अशी भावना व्यक्त करत होते.बस चालक हा रफ गाडी चालवीत होता. रात्रीची वेळ असल्याम नागरिकांनी त्याला रफ गाडी चालवू नको अशी सूचना देखील केली होती असे गावकऱ्यांना समजले.


Post a Comment

0 Comments