जिंकण्याच्या जिद्दीने तो मैदानात उतरला होता. आपले कौशल्य पणाला लावून तो खेळतही होता.
क्रिकेटच्या मैदानावर खेळताना अचानक घात झाला अन् तो आयुष्याचाच डाव हरला. खेळता-खेळता अचानक प्रकृती खालावून एका २० वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आकाश ताराचंद दिवठे (वय २०) असे मृत युवकाचे नाव आहे. तो येथील आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिक या ट्रेडमध्ये शिक्षण घेत होता. मागील दोन वर्षांच्या कोरोनाकाळात सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था बंद होत्या. यावर्षी सर्वच संस्था सुरळीत सुरू झाल्या. शैक्षणिक कार्यासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुतेक संस्थांमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जात आहे. येथेही २२ जानेवारीपासून चारदिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत मैदानी खेळांचेही आयोजन करण्यात आले.
या सर्व आनंदी वातावरणात दि. २३ ला आयटीआयच्या ट्रेडनुसार एकमेकांमध्ये क्रिकेटचे सामने रंगले होते. अतिशय जोशपूर्ण वातावरणात सामना सुरू असताना, स्टम्पच्या मागील बाजूस विकेटकिपरच्या बाजूची जबाबदारी सांभाळण्याचे काम आकाश दिवठे करीत होता. दुपारी ३ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास तो अचानक जमिनीवर कोसळला. लागलीच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
0 Comments