प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी ' ती , बनली चोर अन् आता आली पश्चातापाची वेळ

 


मुंबईत प्रियकराला मदत करण्यासाठी गुन्हेगारी जीवनात परतणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय आरोपी आणि तिच्या प्रियकराने लग्नाचा निर्णय घेतला होता.

नवीन जीवन सुरू करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करू, परंतु यासाठी खूप पैशांची आवश्यकता होती. यासाठी आरोपीने 2022 मध्ये दीड लाख रुपयांचा कॅमेरा चोरून पळ काढला. मात्र, तपासानंतर बोरिवली रेल्वे पोलिसांनी तिला या चोरी प्रकरणी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी तरुणीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तिच्या फेसबुकवर नोकरीची जाहिरात पोस्ट केली होती जी फिर्यादी महाविद्यालयीन विद्यार्थ्याने पाहिली आणि दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर तिला भेटण्यासाठी मालाड रेल्वे स्थानकावर पोहोचला.

या भेटीत तरुणीने तक्रारदाराला मॉलमधील वस्तूंचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी दरमहा २५ हजार रुपये पगार देण्याचे कबूल केले. मात्र यासाठी उच्च दर्जाचा कॅमेरा गरजेचा आहे तो तू खरेदी कर असा सल्ला आरोपीने फिर्यादीला दिला.

फिर्यादीने चांगला कॅमेरा घेण्यासाठी आपली सर्व कागदपत्रे तयार करून आरोपी सोबत कॅमेऱ्याच्या दुकानात गेला. खरेदी केलेला कॅमेरा आरोपीने आपल्या ताब्यात घेतला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मालाड रेल्वे स्थानकावर फिर्यादीला भेटण्यास बोलावले. मात्र फिर्यादी भेटण्यासाठी गेला असता त्याला आरोपी तरुणी कुठेच दिसली नाही.

यावर आरोपीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन देखील बंद असल्याचे समजले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या संदर्भात फिर्यादीने तत्काळ बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आणि आरोपी तरुणीला अटक केली.

नव्याने प्रियकरा सोबत लग्न करून नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी पैशांची गरज असल्याने हा आपला शेवटचा गुन्हा असल्याचे सांगत तिने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी तरुणीकडून कॅमेरा जप्त केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments