खवळलेल्या समुद्रात 'रत्नसागर' मच्छीमारी नौकेला भगदाड पडून पाणी घुसल्याने उलटली. या अपघातात ३ खलाशी बुडाले, तर ४ जण दैवबलवत्तर म्हणून बचावले.
गुजरात तलासरी येथील रत्नसागर, गधाधर, कुणकेश्वरी 2, कपीध्वज या चार नौका 95 वाव समुद्रात मासेमारी करीत होत्या. मंगलोरहून त्या पुन्हा तलासरीच्या दिशेने जात असताना रत्नागिरीपासून खोल समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने या नौकांनी नांगर टाकला होता. यातील रत्नसागर नौकेतील खलाशीही रात्री 8 वाजल्यानंतर जेवून खवळलेला समुद्र शांत होण्याची वाट पाहत बसले होते. मध्यरात्री लाटांच्या मार्यामुळे नौकेच्या मध्यभागातील फळीचा एक खिळा निखळल्याने भगदाड पडून पाणी आत घुसले. खलाशांना काही समजण्यापूर्वीच नौका कलंडू लागली.
त्यावेळी नौकेच्या डेकवर बसलेल्या खलाशांनी ओरडून केबीनमधील तांडेल व अन्य खलाशांना जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वजण नौकेच्या बाहेर पडण्यापूर्वीच नौका पाण्यात उलटी झाली. यावेळी डेकवरील कल्पेश लहाने भंडार (वय 30, तलासरी), दीपक भिखार वळवी (वय 38, तलासरी), अंतोल देवल्या भगत (वय 32) , जयवंत जंत्र्या खरपडे (वय 50, तलासरी), हे पाण्यात फेकले गेले. त्यांनी नौकेवरील दोर पकडून काही काळ पाण्यात लटकत राहिले. त्यानंतर उलट्या झालेल्या नौकेवर चढून आपला जीव वाचवला. यावेळी त्यांनी जवळच असलेल्या नौकांना ओरडून बचावासाठी प्रयत्न केला. अपघातग्रस्त नौकेपासून जवळ असणार्या गदाधर या नौकेतील खलाशांनी या बुडालेल्या नौकेवरील चौघांनाही आपल्या नौकेवर घेतले. हा प्रकार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडला.
0 Comments