रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कुची गावानजीक ३० डिसेंबर रोजी मोटारीतील महिलांसह प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व दागिन्यासह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.
दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. याप्रकरणी जलवा उर्प त्रिदेव सिसफुल भोसले (वय ४२, रा. लिंगनूर, ता. मिरज) याला अटक केली आहे. त्याचे चार साथीदार फरार झाले असू त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर येथील माधवी जनार्दन जानकर (वय २५, रा. घाडगे कॉलनी, कोल्हापूर), विकास परशुराम हेगडे (वय २२, रा. जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, कोल्हापूर) व भाग्यश्री विलास पाटील (वय २८ रा. सरनोबतवाडी, जि. कोल्हापूर) हे शुक्रवार ३० डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूरहून पंढरपूरकडे मोटारीतून निघाले होते. भाग्यश्री पाटील या मोटार चालवत होत्या. कुची हद्दीत रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एका धाब्यानजीक त्यांच्या मोटारीवर दगड मारला. यामुळे भाग्यश्री पाटील यांनी मोटार रस्त्याकडेला उभा केली. काही कळण्याच्या आतच पाच चोरटे तेथे आले. यातील दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळ असलेले सोन्या-चांदिचे दागिने व रोख रकमेसह मोबाईल असा एक लाख ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. यावेळी माधव व विकास यांची चोरट्यांसोबत झटापटही झाली. यात ते दोघे जखमी झाले.
या दरोड्याचा तपास एलसीबीकडे होता. एलसीबीच्या पथकाला जलवा भोसले व त्याच्या साथीदारांनी दरोडा टाकल्याची माहिती मिळाली. पथकाने लिंगनूर येथे छापा टाकून जलवा याला ताब्यात घेतले. त्याचे इतर चार फरार झाले आहेत. जलवाकडून पोलिसांनी चोरीतील मोबाईल हस्तगत केला आहे.
0 Comments