3 वाहनासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

 


शहराजवळ कळमसरे गावात गुदामात बेकायदा साठविलेल्यारेशनच्या १०२ क्विंटल तांदळासह तीन वाहनेपुरवठाविभागाने जप्त केली.

कारवाईत पाच जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत दहा लाख ६५ हजार रुपये आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांना मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी (ता. १०) दुपारी ही कारवाई करण्यात आली. शिरपूर-चोपडा रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या गुदामावर श्री. मिसाळ, तहसीलदार आबा महाजन व अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

घटनास्थळावरून तांदूळ व इतर धान्य रिक्षा, टेम्पो आदी वाहनांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. पथकाने चौकशी केल्यानंतर कोणाकडेही रेशनचे धान्य साठवणूक व वाहतुकीचा परवाना आढळला नाही. त्यामुळे रेशनचे धान्य अवैधरीत्या साठवून काळ्या बाजारात विकण्यासाठी पाठविण्यात येत असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले.

पुरवठा विभागाच्या कारवाईत २०२ पोत्यांमध्ये साठविलेला १०२ क्विंटल तांदूळ, सात गोण्यांतील मका व ज्वारी, दोन रिक्षा व एक टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरवठा निरीक्षण अधिकारी अपर्णा वडूरकर यांच्या फिर्यादीवरून संशयित लालाराम भंवरलाल जाट, महेंद्र लालाराम जाट, रिक्षाचालक व मालक, हमाल अक्षय संजय बेलदार, टेम्पोचालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयितांनी तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थ्यांकडून साठा घेतल्याचा संशय आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मंडळ अधिकारी प्रशांत ढोले, पुरवठा निरीक्षक अपर्णा वडूरकर यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments