देशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा

 



पाणीमिश्रित बनावट देशी दारू निर्मिती, वाहतूक व विक्री करणार्‍या कारखान्यावर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन विभागाने गुरुवारी व शुक्रवारी बेधडक कारवाई करून सुमारे 71 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच जणांना अटक केली.आहे.

नाणेकरवाडी येथे केलेल्या कारवाईत सुनील राममुरत बिंद (26, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे), वाहिद साजिद शेख, (23, रा.मुटकेवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) हरिशचंद्र ब्रिजेश कुमार (24, रा. नाणेकरवाडी, चाकण,ता. खेड, जि. पुणे) या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच उर्से टोल नाका येथील कारवाईत गामित सोमवेलभाई सिंगाभाई (रा.गुजरात) व मोहन दिनराम खथात (रा.राजस्थान) या दोघांना अटक करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार दुय्यम निरीक्षक स्वाती भरणे यांना चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाणेकरवाडी येथे कमानीजवळ, पत्राद्शेडमध्ये बनावट देशी दारूची निर्मिती, वाहतूक व विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 26) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन या वेळेत सदर ठिकाणी छापा मारला असता बनावट देशी दारू टॅगो पंच 180 मिली क्षमतेच्या 432 बाटल्या, देशी दारू टॅगोपंच 180 मिली क्षमतेच्या 288 रिकाम्या बाटल्या, 2 प्लास्टिकचे पाण्याचे कॅन, ब्रीझा गाडी क्र. (एमएच 14 जेएम 8228) व होंडा कंपनीची एक्टिव्हा क्र. (एमएच 14 जेके 4854) हा मुद्देमाल मिळून आला. गुन्ह्याच्या ठिकाणी बनावट देशी मद्य बनवत असताना देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या बाटल्याची बुचे दाभणाच्या साहाय्याने उघडून त्या पाणीमिश्रित मद्य भरण्यात येत होते.

तसेच दुय्यम निरीक्षक दीपक सुपे यांना उर्से टोलनाका येथे बेकायदा विदेशी मद्य वाहतूक करणारा कंटेनर (क्र. एमएच 01एन 8007) येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार (दि..27) सकाळी साडेनऊ वाजता त्या ठिकाणी सापळा लावला असता, आरोपी गामित सिंगाभाई व मोहन खथात यांच्या कंटेनरची तपासणी केली असता, गोवा राज्य निर्मित व गोवा राज्य विक्रीसाठी असलेला 47 लाख 52 हजारांचे विदेशी मद्य, कंटेनर, मोबाईल असा 62 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.


Post a Comment

0 Comments