शहरात कोयत्याच्या नावाने गदारोळ होत असताना पुणे पोलिसांनी शहरात धडक कारवाई सुरू केली आहे. डॉयस प्लॉट परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने एका सराईताला अटक करताना त्याच्याकडून 9 कोयते जप्त केले.
त्याने हे कोयते एका बारदानात गुंडाळून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हेगार अक्षय अप्पया कांबळे (वय 27, रा. स.नं. 429/30, डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोयता बाळगणार्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला आहे.
त्या अनुषंगाने बुधवारी गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे यांना मिळालेल्या बातमीवरून सराईत कांबळे हा त्याच्या राहत्या घरासमोरील कॅनॉलच्या कडेला अंधारात हातात एक बारदान (गोणी) धरून संशयितरीत्या लपून पथकाला पाहत असताना आढळला. पथकाला संशय आल्याने त्याला पाठलाग करून पकडले. त्याची झडती घेतली असताना त्याच्याकडील गोणीत 9 कोयते लपविल्याचे आढळून आले.
त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो स्वारगेट पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला कोयते बाळगण्याचे कारण विचारता, त्याने प्रतिस्पर्धी गुन्हेगाराकडून जीवाला धोका असल्याने त्याने स्व-संरक्षणार्थ जवळ बाळगल्याची कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, उपनिरीक्षक नितीन कांबळे, अंमलदार शंकर नेवसे, गजानन सोनुने, निखिल जाधव, मोहसीन शेख, कादिर शेख, समीर पटेल, प्रमोद कोकणे, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments