वाघोली: रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर चालक व क्लीनर यांच्या झालेल्या वादातून अवजड हत्याराने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला लोणीकंद तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे अवघ्या 12 तासात जेरबंद केले आहे.
शमशुल अली अहमद खान (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे खून झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुळापुर-लोणीकंद रोडवर (दि. २६) वढू बुद्रुक (ता. हवेली) गावचे हद्दीत हॉटेल सिताईचे समोर कंटेनर (डीएन ०९ आर ९०५८) मध्ये एक इसम जखमी व रक्ताचे थारोळ्यात बेशुध्द अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून सदर व्यक्तीस पोलिसांनी उपचारासाठी ससून हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. व्यक्तीच्या डोक्यात अवजड हत्याराने मारहाण करुन त्याचा खून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने (दि. २७ जानेवारी) कंटेनर मालकाच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेणेकामी दोन पथके रवाना केली होती. तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव व त्यांचे पथकाने अधिक तपास केला असता गुजरात येथील व्यक्तीकडे कंटेनरवर क्लीनर म्हणून काम करत असलेल्या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
गुजरात येथील संजय रामफल यांच्या कंटेनरवर आरोपी क्लीनर तर मयत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. दोघेही मित्र होते. परंतु रस्ता चुकल्याचे कारणावरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला. झालेल्या वादातून आरोपी शमशुल याने अवजड हत्याराने मारहाण केली यामध्ये शहजाद याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणामुळे अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे पोलीस अंमलदार कैलास उगले, सारंग दळे, अमित देशमुख, बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंके, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे, समीर पिलाणे, पांडुरंग माने यांनी केली आहे.
0 Comments