शहर परिसरात टोळीयुध्दाचा वाद नवा नाही. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील अंतर्गत वादाचा फटका आता परिसरातील स्थानिकांना बसत आहे. मंगळवारी वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील एका नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यावर दोन युवकांनी कोयत्याने हल्ला केला.
जखमी युवक परिसरातील एका इमारतीत लपल्यामुळे त्याचा जीव वाचला. या टोळक्याने तेथील स्थानिकांनाही धमकाविण्याचा प्रयत्न केला.
येथील गुरूगोबिंद सिंग फाउंडेशनच्या महाविद्यालयातील संगणक शाखेचा यश गरूड याचे काही मुलांशी सोमवारी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात ठेवत संशयित हे यशच्या मागावर होते. मंगळवारी महाविद्यालय सुटल्यावर यश घरी जात असतांना राम मंदिरा समोरील रस्त्यावर दोन दुचाकींवरुन दोन संशयित यशच्या दिशेने आले. त्यांनी त्यांच्याकडील दोन कोयते बाहेर काढले. संशयितांपैकी एकाने यशवर कोयत्याने हल्ला केला. यश लगेच जवळील समर्थ प्लाझा इमारतीत शिरला. त्याच्या मागे दोन्ही संशयित कोयते घेऊन इमारतीत शिरले. त्यावेळी इमारतीच्या सुरक्षारक्षकाच्या पत्नीने संशयितांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
संशयितांनी त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवत यशचा माग घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी झालेली आरडाओरड ऐकून लोकांनी इमारत परिसरात धाव घेतली. इमारती मधील लोकही बाहेर आल्याने संशयितांनी यशला सोडून दिले. त्यावेळी संशयितांनी आज सुटलास पुन्हा तुझी खैर नाही, अशी धमकी दिली. संशयित दुचाकीवरून निघून गेले. परिसरातील नागरिकांनी जखमी यशवर प्राथमिक उपचार करत पोलिसांना याविषयी माहिती दिली. गस्ती पथकातील पोलिसांनी जखमी यशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. मागील काही वादामुळे हा हल्ला झाला.
हल्लेखोर घरा जवळील परिसरात राहत असल्याची माहिती यशने पोलिसांना दिली. पोलीस दिवसभर संशयिताच्या मागावर होते. हा थरार अनुभवणाऱ्या नागरिकांच्या मनातील भीती कायम आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा असा त्रास स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याविषयी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता हा महाविद्यालयाबाहेरील प्रकार असल्यामुळे बोलण्यास नकार दिला.
मी घरात होते. त्यावेळी जिन्यातून एक जण जोरात पळत गेला. कोण जोरात पळाले, हे पाहण्यासाठी बाहेर डोकावले असता दोन जण कोयते घेऊन वर चढत होते. आरडाओरड होत होता. काहींनी त्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ते कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. इमारतीतील लोक बाहेर आल्याने पुढील अनर्थ टळला. पण त्या मुलांचा हिंस्त्र चेहरा, धमकाविणे डोळ्यांसमोरून जात नाही. त्यावेळी लहान मुले घरातच होती. ती या प्रकाराने घाबरली आहेत.
हातात कोयते घेऊन दोन मुले एका मुलाच्या मागे धावत असल्याचे दुरूनच पाहिले. काय होते हे समजत नव्हते. हातातील काम सोडून इमारतीच्या दिशेने धावत असतांना जोरजोरात ओरडण्याचा आवाज, बायकांचे किंचाळणे ऐकू आले. इमारतीच्या आवारात पोहचण्या आधीच कोयते हातात असलेले मुले ज्यांनी तोंडाला रुमाल लावला होता, ते दुचाकीवरून पळून जाताना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोयता उगारला
0 Comments