शाळेतील एका वर्गखोलीत शिरून व तेथील विदयाथ्यांना बाहेर काढून एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढण्यात आली.
माझ्याशी लग्न कर असे दरडावत त्या शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी २६ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पिडिताच्या आईच्या तक्रार नोंदविली. त्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी चेतन संजय निवल (२६, रा. जळका पटाचे, ता. धामणगाव) याच्याविरूद्ध विनयभंग, धमकी, पोक्सो व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. २६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास १३ वर्ष ९ महिने वयाची विदयार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना आरोपी चेतन निवल हा दुचाकीने मागून आला. रस्ता अडवुन तुझे फोटो काढून मला पाठव, नाही पाठविले तर घरी येऊन मारेन, अशी धमकी तिला दिली. तत्पुर्वी, १५ दिवसांआधी आरोपी हा पिडीताच्या शाळेत जाऊन तिच्या वर्गात शिरला होता. वर्गातील मुला मुलींना बाहेर काढले. आपल्या सोबत लग्न कर असे तो दरडावणीच्या सुरात म्हणाला. पिडीताने त्यास नकार दिला असता, तो तेथून निघून गेला. २६ जानेवारी रोजी देखील त्याने छेडखानी केल्याने ती बाब तिने आईला सांगितली. तिच्या आईने तिला घेऊन गुरूवारी पोलीस ठाणे गाठले.
ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीच्या छेडखानीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. खोलापूर पोलीस ठाण्याच्या हददीत राहणारी १६ वर्षे ९ महिने वयाची मुलगी बसस्टॅंडवरून पायदळ घरी जात असताना आरोपी सागर अंबाडकर (३०, रा. कसबा खोलापूर) याने तिचा पाठलाग केला. तिच्याशी खाेटे बोलून तिला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यादरम्यान त्याने तिच्याशी अश्लिल कथन केले. तिचा विनयभंग केला. त्यामुळे तिने घाबरून चालत्या दुचाकीवरून खाली उडी घेतली. त्यामुळे ती जखमी झाली. २६ जानेवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. खोलापूर पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी सागर अंबाडकर विरूद्ध गुन्हा दाखल केला.
0 Comments