पैशाच्या वादावरून अपहरण करून मित्रांनीच केला मित्राचा खून

 


फंडातील पैशांच्या देवाणघेवाणच्या कारणावरुन अपहरण करून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना कणसे (ता.आंबेगाव) येथे घडली. खून झालेल्या तरुणाचे नाव सागर रखमा आमोंडकर(वय ३२ रा.कानसे-माळवाडी) असे आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व पोलीस उपनिरीक्षक ए एम... चव्हाण यांनी गतिमान पद्धतीने तपास करून सहा तासात आरोपींना जेरबंद केले. आरोपी रोहन उर्फ सोन्या एकनाथ बो-हाडे (रा.कानसे- माळवाडी ता. आंबेगाव), अमित उर्फ गंग्या अरुण सोनवणे, (वय २६, रा. गंगापुर खुर्द ता. आंबेगाव)व अक्षय उर्फ सोन्या अनंत येवले (वय २८ रा.गंगापुर खुर्द) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार"सागर आमोंडकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार वडील रखमा जयराम आमोंडकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात रविवारी (ता.१५) रात्री सात वाजता दिली होती. घोडेगाव पोलिसांनी शोध मोहीम राबविली. संशयित म्हणून बोऱ्हाडे याला घोडेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर बोऱ्हाडेची बोबडी वळली. व त्याने खुनाची कबुली दिली. फंडातील ४८ हजार रुपयांची रक्कम सागर आमोंडकरने उचलून बोऱ्हाडेला दिली होती. वर्ष झाले तरी बोऱ्हाडे रक्कम परत करत नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे झाली.

संतप्त झालेल्या बोऱ्हाडेने मित्र सोनवणे व येवले यांच्या मदतीने सागर आमोंडकरचे अपहरण केले. मारहाण केली. त्यात सागरचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कणसे गावाजवळ डाव्या कालव्यात टाकून दिला होता.दरम्यान आरोपींनी खुनासाठी कोणती शस्त्र वापरली याचा शोध पोलीस घेत आहेत.


Post a Comment

0 Comments