प्रेमविवाहाच्या वादातून थोरल्याने धाकट्याला संपविले

 


धाकट्याने आपल्यापूर्वीच प्रेमविवाह केल्याने सामाजिक बदनामी झाली, असे थोरल्या भावाला वाटले.

त्यातून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत होऊन थोरल्याने धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केला. ही धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काजना येथे १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सुधीर चरणदास घरडे (२७, रा. काजना) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी सचिन उर्फ सतीश चरणदास घरडे (३०, रा. काजना) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सुधीरने काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला. थोरला भाऊ सचिनला ते रुचले नाही. त्यावरून सचिन हा धाकटा भाऊ सुधीरसोबत नेहमी वाद घालत होता. मंगळवारी सायंकाळी याच कारणावरून दोघा भावांमध्ये घरासमोरच वाद झाला. या वादात सचिनने सुधीरवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

सुधीर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर सचिन तेथून पसार झाला. हा प्रकार सुधीरची पत्नी कशीश (१९) यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने सुधीर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुधीर यांना मृत घोषित केले. पोटात दोन वार आहेत.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी मृतक सुधीरची पत्नी कशीश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंदकुमार दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीच्या शोधार्थ पोलीस ठाण्याची दोन पथके पाठविण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा देखील समांतर तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments