राज्यस्थानच्या बारमेर जिल्ह्यामध्ये एका प्रेमी युगलाने तीन दिवसांपूर्वी एकत्र आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला.
प्रेमी युगलानं आत्महत्या करण्यापूर्वी दारूची पार्टी तर केलीच, पण दोघांनीही सोशल मीडियावर टाकण्यासाठी रीलही बनवल्याचं तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे, हे रील इन्स्टाग्रामवर अपलोड करून दोघांनी आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या केलेल्यांची नावे माघीबाई (वय 25) आणि माधाराम (वय 26) अशी असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बारमेर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतल्या आटी गावात उघडकीस आली.
तिथे एक तरुण आणि तरुणीनं प्रेमप्रकरणातून एकत्र आत्महत्या केली होती. माघीबाई आणि माधाराम अशी मयतांची नावं आहेत. मयत माघीबाई कलानीचा तळा बुथ जेटमाळ येथील रहिवासी होती, तर माधाराम हा इंदारा आटी इथला रहिवासी होता. माघीबाई आणि माधाराम या दोघांचंही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न झालेलं होतं.
विवाहित असूनदेखील या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. दोघांनाही मुलं आहेत; मात्र दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. या विवाहबाह्य संबंधांवर दोघांच्या नातेवाईकांनी अनेकदा आक्षेप घेऊन त्यांना समजावून सांगितलं होतं. त्या दोघांना ते मान्य नव्हतं.
यावरून दोघांच्या कुटुंबात वाद होत होता. मृताची पत्नी दोन दिवसांपूर्वी मुलांसह पिहारला गेली होती, असं सांगितलं जात आहे. त्याबाबत धोरिमाण्णा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंदही करण्यात आली होती. दरम्यान, मयत माघीबाईला चार अपत्य असून, माधाराम याला दोन मुलं आहेत.
पत्नी घरातून निघून गेल्यावर माधाराम हा माघीबाईकडे गेला. तिथे दोघांनी आधी दारू पार्टी केली. मग दोघांनी सोशल मीडियासाठी रील केलं. त्यानंतर माधारामनं हे रील त्याच्या सोशल मीडियावरून आपल्या पत्नीला पाठवलं.
नंतर दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या उपस्थितीत खाली उतरवले. त्यानंतर बारमेर जिल्हा मुख्यालयाच्या शासकीय रुग्णालयात मृतदेहांचं पोस्टमॉर्टेम करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाने संपूर्ण बारमेर जिल्हा हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून बारमेर जिल्ह्यात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हा जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे.
0 Comments