न्हावरे येथील पवारवस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाल्याने न्हावरे परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेत शेतकरी शरद पवार यांची शेळी मृत झाल्याने त्यांचे नुकसान झाले.
घटनेचा पंचनामा वनाधिकारी विशाल चव्हाण यांनी केला. याबाबत अधिक माहिती की, गोठ्यातील जनावरांच्या ओरड्याने पवार यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता अंधारात बिबट्या शेळीवर हल्ला करीत असल्याचे त्यांनी पाहिले.
दरम्यान, शेळीला बिबट्याच्या तावडीतून सोडण्यासाठी पवार यांनी आवाज केल्याने बिबट्याने कसबसे सावज टाकून घराशेजारीच असणार्या उसात धूम ठोकली. मात्र, बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला होता. न्हावरे परिसरात वारंवार बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत असल्याने या घटनेने घबराट पसरली आहे. वन खात्याने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अजित सहकारी संस्थेचे संचालक गोरख पवार व ग्रामस्थांनी केली आहे.
0 Comments