आपल्या सोबत नुकत्याच विवाहबध्द झालेल्या आणि अवघ्या तीन महिन्यात गायब झालेल्या पत्नीचे यापूर्वीच लग्न झाले असून तीला दोन मुली आहेत. पत्नी, तीची आई आणि एका मध्यस्थाने आपली फसणवणुक केली.
विवाहासाठी व्याजाने घेऊन मध्यस्थाला दिलेले दोन लाख तीस हजार रूपये वाया गेले. नाचक्की नशीबी आली, यामुळे खचून गेलेल्या महेंद्र बेंद्रे (वय ३२, रा.दहेगाव, ता.राहाता) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. एका कष्टाळू निरपराध तरूणाचे जीवन फसवणुक करणाऱ्या टोळीने उध्वस्त करून टाकले.
आयुष्य बरबाद करणाऱ्या या कहाणीचे तपशीलवार वर्णन करणारी चिठ्ठी महेंद्रने आपली जिवनयात्रा संपविण्यापूर्वी लिहून ठेवली. पोलीसांनी या चिठ्ठ्या ताब्यात घेऊन मध्यस्थ वसंता परबतराव गिऱ्हे, (रा.पांगरा गडदे, जि.जालना), पत्नीच्या भुमिकेत फसवणुक करणारी राणी गणेश शिरसाठ व तीची आई शारदा गणेश शिरसाठ (रा.अंबरवाडी, जि.जालना) यांच्याविरोधात फसवणुक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, महेंद्र हा नगर येथील औद्योगिक वसाहतीत कामाला होता. आरोपी गिऱ्हे यांच्या मध्यस्थीने त्याचे राणी सोबत दहेगावात मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत गेल्या सात नोव्हेंबर रोजी लग्न लावून देण्यात आले. भाड्याने घेतलेल्या खोलीत तो नगर येथे रहायला गेला.
दरम्यानच्या काळात तो तीच्या गावी जाऊन आला. खरी परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. नंतर अवघ्या तीन महिन्यात पत्नी राणी गायब झाली. जाताना घरातले वीस हजार रूपये घेऊन गेली.
त्याने याबाबत नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर तिच्या आईने त्याचा कॉल रेकार्डींग करून तू तुझ्या पत्नीला मारहाण केल्याचे पोलीसांना सांगू, अशी धमकी द्यायला सुरवात केली होती. पूरता खचून गेलेल्या महेंद्र ने दहेगावी येऊन रात्री (ता.२२ जानेवारी) गळफास घेऊन आपले जिवन संपवले.
मुलींची संख्या घटल्याने मोठ्या रकमा घेऊन उपवर मुलांची फसवणुक करण्याच्या घटना सर्वत्र वाढत आहेत.
0 Comments