रिव्हॉल्वरचा धाक दाखवून २९ वर्षीय अभिनेत्याचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका होताच या अभिनेत्याने ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती.
त्यानंतर अपहरणकर्त्यांविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याचा पुढील तपास घाटकोपर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून या गुन्ह्यांचा घाटकोपर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करत आहेत.
मूळचा पोर्ट ब्लेअर येथील रहिवासी असलेला अनुशील अनुप चक्रवर्ती हा चित्रपट अभिनेता असून तो त्याच्या कुटुंबासह जोगेश्वरीतील ओशिवरा पार्क परिसरात राहतो. त्याने स्वत:च्या करिअरची सुरुवात झी कंपनीच्या एका म्युझिक व्हिडिओद्वारे केली होती. त्यानंतर त्याने ‘गेम ऑफ स्टुपिड लव्हर’ या चित्रपटाद्वारे पर्दापण केले होते.
दोन दिवसांपूर्वी तो घाटकोपर येथून विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावरून त्याच्या मोटरगाडीमधून जात होता. काही अंतर गेल्यानंतर त्याच्या मोटरगाडीच्या पुढे दुसरे वाहन आले. या वाहनातून उतरलेल्या अज्ञात व्यक्तीने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याच्याच मोटरगाडीमधून त्याचे अपहरण केले. त्याला एका निर्जनस्थळी नेऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्याच्या आईला दूरध्वनी करून अपहरणकर्त्यांनी अनुशीलचे अपहरण झाल्याची माहिती दिली आणि त्याच्या सुटकेसाठी वीस लाख रुपयांची खंडणी मागितली.
रक्कम न दिल्यास अनुशीलला सोडणार नाही, अशी धमकीच अपहरणकर्त्यांनी दिली होती. त्यामुळे त्याच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला. रात्री उशिरा त्याला अपहरणकर्त्यांनी सोडून दिले. घरी आल्यानंतर त्याने दुसर्या दिवशी म्हणजे शनिवार, ७ जानेवारी रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तेथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याने अपहरणकर्त्यांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध खंडणीसह अपहरण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास घाटकोपर पोलिसांकडे सोपविण्यात आला असून त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.
0 Comments