नागपूर : वेगात चाललेली कार अनियंत्रित झाल्याने थेट झोपडपट्टीत शिरली व पाच झोपड्या नेस्तनाबूत झाल्यावरच थांबली.
संबंधित झोपड्यांमध्ये मजूर झोपले होते. मात्र, कारचे चाक बांबूंमध्ये अडकल्यामुळे कार थांबली व थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. तरीदेखील या घटनेत पाच मजूर जखमी झाले असून, या अपघातामुळे मध्यरात्री थरकाप उडाला होता. यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली.
वीटभट्टी चौकाजवळील मोकळ्या जागेत झाडू बनवून त्यांची विक्री करणाऱ्यांच्या अनेक झोपड्या आहेत. हे सर्व लोक छत्तीसगड राज्यातून आलेले आहेत. मध्यरात्रीच्या १२.१० च्या सुमारास कार (क्र. एमएच ३३ ए ४३३४) वेगाने पॉवर ग्रिड चौकाच्या दिशेने जात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व दुभाजकावरून कार थेट झोपड्यांमध्ये घुसली. काही मजूर त्यावेळी जेवण करत होते, तर काही कुटुंबीयांसह झोपलेले होते. कारचा वेग जास्त असल्याने पाच झोपड्या जमीनदोस्त झाल्या. तेथील बांबूंमध्ये चाक अडकल्याने कार थांबली, अन्यथा पुढील झोपड्यांमध्ये झोपलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांच्या प्राणावर संकट आले असते.
जोरदार आवाजामुळे सर्वांनी धाव घेतली असता भयंकर दृश्य दिसले. जखमी मजुरांना झोपड्यांतून बाहेर करण्यात आले. दुसरीकडे कारदेखील चक्काचूर झाल्याने चालक आत अडकला होता. यशोधरानगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. खूप प्रयत्नांनंतर कारचा दरवाजा तोडून कारचालकाला बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले. सुमित वालिया, गोकर्ण सिसोदियासह पाच मजूर जखमी झाले. पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments