जुन्या वादातून अकरावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

 


वाशिम : जुन्या वादातून बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अकरावीच्या तीन विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना वाशिममध्ये घडली आहे.

याप्रकरणी कारंजा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निखिल मेहरे असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आरोपीविरोधात कलम 307, 324, 504, 506, 34 अंतर्गत कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिलच्या हल्ल्यात एक विद्यार्थी गंभीर तर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामधील विद्याभारती महाविद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विज्ञान शाखेत इयत्ता बारावीत शिकत आहे. पीडित विद्यार्थीही याच महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकतात.

जखमी विद्यार्थी आणि आरोपी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून काही कारणावरुन वाद सुरु होता. यातूनच आरोपी नेहमी पीडित विद्यार्थ्यांना धमकावत होता.

आज सकाळी 9 वाजता फिर्यादी आणि त्याचे दोन मित्र असे तिघेजण कॉलेजला जात असताना निखिल मेहरे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र यांनी तिघांपैकी एकाला शिवीगाळ केली.

पीडित मुलाने शिविगाळ का करतो असे विचारले असता निखिल मेहरे याने त्याच्या खिशातून एक बटन चाकू काढून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर वार केला.

त्याला वाचवण्यासाठी फिर्यादी आणि त्याचे मित्र गेले असता निखिल मेहरे यांनी फिर्यादीच्या मित्रावर आणि फिर्यादीवरही चाकूने हल्ला केला. तर आरोपीच्या मित्रांनीही पीडितांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपींनी पीडितांना शिवीगाळ करून मारण्याचीही धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी निखिल मेहरे याच्या विरोधात कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments