औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर बोरीसावंत शिवारात एसटी महामंडळाची बस उलटून झालेल्या अपघातात १२ प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवार) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.
या विषयी अधिक माहिती अशी की, आंबाजोगाई आगाराची चंद्रपूर-अंबाजोगाई (क्रं. एमएच-09-एफएल-1020) ही बस मंगळवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर बोरीसावंत शिवारात आली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बसला कट मारला. यामध्ये ट्रकची बसला धडक बसू नये तसेच, प्रवाशांना वाचविण्यासाठी चालकाने बस बाजूला घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र यामध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.
या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, या प्रकाराची माहिती एका कारचालकाने रिपाईचे पदाधिकारी किरण घोंगडे यांना दिली. त्यांनी तातडीने या बाबतची माहिती गावकरी व हट्टा पोलिसांना दिल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार शेषराव लाखाडे, सय्यद खतीब, राजेश ठाकूर, आंबादास बेले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले.
या अपघातात १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये बहुतांश प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी वाहनाने हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
0 Comments