तालुक्यातील नागर जवळ येथे मोबाईल पाहण्यात गुंग असलेल्या १३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
अभिषेक बाबासाहेब होगे असे मृत मुलाचे नाव आहे.
बाबासाहेब होगे यांची मानवत तालुक्यातील नागर जवळ शिवारात ती आहे. आज दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात गेले होते. यावेळी १३ वर्षीय त्यांचा मुलगा अभिषेक देखील सोबत होता. वडील आणि नातेवाईक शेत कामात व्यस्त असताना अभिषेक मोबाईल पाहण्यात गुंग होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास वडिलांनी विहिरीजवळ असलेली एक वस्तू घेऊन येण्यास अभिषेकला सांगितले . मोबाईलमध्ये गुंग अभिषेक तसाच विहिरीकडे गेला. कठडे नसल्याने मोबाईलमध्ये गुंग अभिषेक थेट विहिरीत पडला. आतील लोखंडी रॉडवर आदळल्याने तो गंभीर जखमी होऊन पाण्यात बुडाला.
अभिषेक विहिरीत पडल्याचे कळताच वडील आणि नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. अर्ध्या तासानंतर अत्यवस्थ अभिषेकला विहिरीतून बाहेर काढून मानवत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून अभिषेकला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक ताटे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. अचानक घडलेल्या घटनेने होगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 Comments