गोंदियामध्ये गुरुनानक वार्डात मोठे ट्रेडर्स आहे. दरम्यान ट्रेडर्समधून जमा झालेले पैसे खात्यात भरण्यासाठी जाणाऱ्या दिवाणजीला दोन अज्ञात इसमांनी फसवल्याची घटना समोर आली आहे
आपण सीआयडीचे पोलिस आहोत, असे सांगून त्यांच्याकडील पिशवीतून 1 लाख 35 हजार रुपये चोरून नेल्याची घटना गोंदिया शहरातील गांधी प्रतिमा चौकात घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील गुरूनानक वॉर्डात राहणारे हेमंत अग्रवाल यांच्या मोबाइलचे दुकान आहे. दुकानाचे पैसे शहराच्या देशबंधू वॉर्डातील जनता सहकारी बँकेतील खात्यात जमा करण्यासाठी अग्रवाल यांचे दिवाणजी बसंत बकाराम सोनवाने (79, रा. पिंडकेपार, गोंदिया) यांच्याकडे दिले. ते पैसे जमा करण्यासाठी बँकेत पायी पायी जात असताना त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी गांधी प्रतिमा चौकात थांबवून आपण सीआयडीचे पोलिस आहोत, तुमच्याकडे गांजा आहे, याची तपासणी करू द्या, असे सांगितले.
दरम्यान, त्या चोरट्यांनी संधी साधून त्यांच्याकडील पिशवीतील 2 लाख 1 हजार रुपयांपैकी 1 लाख 35 रुपये पळवून नेले. तर 66 हजार रुपये वेगळे असल्याने हे पैसे वाचले. आरोपींनी तपासणीच्या नावावर त्यांची दिशाभूल करीत 1 लाख 35 हजार रुपये असलेला बंडल चोरून नेले. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी त्या तोतया दोन सीआयडी पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments