महिलेने बॅगेतून लांबविली साडेचार लाखांची रोकड

 


नगर-तिसगाव दरम्यान खासगी गाडीतून प्रवास करताना एकलव्य शिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक शिवाजी मारूती बडे (रा. विजयनगर, ता.पाथर्डी) यांच्या बॅगेतील साडेचार लाख रूपये एका अनोळखी महिलेने लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

याप्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडे हे शुक्रवारी दुपारी पाथर्डी येथून नगरला फ्लॅट बुक करण्यासाठी पाच लाख रूपये घेऊन गेले होते. मात्र, बिल्डर न भेटल्याने तेे पैसे घेऊन सायंकाळी परत पाथर्डीला जाण्यासाठी निघाले. रात्री 8 च्या सुमारास नगर येथील स्टेट बँक चौकातून शेवगाव येथील इर्टिगा गाडीमध्ये मागील सीटवर पैशाची बॅग मांडीवर घेऊन बडे बसले होते. त्यांच्या डाव्या बाजूला एक पाथर्डीचा ओळखीचा इसम व उजव्या बाजूला छोटे मूल जवळ असलेली अनोळखी महिला बसली होती.

तिसगाव येथे गाडी आल्यावर बडे व पाथर्डी येथील ओळखीचा इसम शेवगाव-पाथर्डी चौकात रात्री साडेनऊच्या सुमारास उतरले. बडे यांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा स्वतःची गाडी घेऊन तिसगाव येथे आला होता. तो वडिलांना घेऊन पाथर्डी येथे घरी आला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी शनिवारी बडे यांनी उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी संबंधित व्यक्तीला सकाळी घरी बोलावले. त्यावेळी बॅगेमध्ये साडेचार लाख रूपये कमी असल्याचे आढळले. त्यावेळी बॅगेतील पैसे गाडीत छोट्या बाळासह बसलेल्या महिलेने काढून घेतल्याचे बडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर बडे यांनी संबंधित महिलेविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments