बालाजी ऑइल मिलच्या संचालकांकडे आठ लाखांची खंडणी मागण्यासाठी आलेल्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी छापा टाकून अटक केली.
सोमवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शशिकांत कैलास सोनवणे (३९, द्वारका नगर, भुसावळ), सिद्धार्थ सुनील सोनवणे (२०, रा. जे. टी. एस. रोड, भुसावळ), पत्रकार मिलिंद प्रकाश बोदडे (३६), आकाश सुरेश बोदडे (२२, दोघे रा. तळणी, जिल्हा बुलढाणा), गजानन आनंदा बोदडे(३२), साक्षी राजू तायडे (३२, दोघे रा. कुलकर्णी प्लॉट, भुसावळ) आदी आठ जणांचा समावेश आहे.
एरंडोल येथील बालाजी मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांना पुरुष व महिलेने मिलबाबत तक्रार करण्याची धमकी देत त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणी मागितली होती. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीतील तीन जण सोमवारी ऑईल मिलमध्ये खंडणी घेण्यासाठी येणार होते. तिथे पोलिसांना सापळा लावला. टोळीतील दोन महिलांसह तीन जण ऑइल मिलमध्ये आले व चार जण बाहेर थांबले.
अनिल काबरा यांच्याकडून महिलेने एक लाख रुपयांची खंडणी घेताच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. इकडे छाप्याची चाहूल लागल्याने बाहेर उभ्या असलेल्या चारही जणांनी दुचाकीवर जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पकडले. या छाप्यात एक लाख रुपये रोख, आठ मोबाईल दोन दुचाकी, एक कार असा एकूण दहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन मुली अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हेकॉ. अनिल पाटील, पोना. मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली
0 Comments