जालनामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेतातून विद्युत मोटार बंद करून घराकडे येत 3 मित्रांच्या दुचाकीला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
धडक एवढी भीषण होती कि यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर बाकी दोघेजण गंभीर जखमी झाले. गजानन अशोक जाधव असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अकोला देव येथे टेंभुर्णी- देऊळगाव राजा रोडवर घडला आहे.
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील 25 वर्षीय गजानन अशोक जाधव, 26 वर्षीय गणेश बाबूराव सवडे आणि 22 वर्षीय धनंजय शिवाजी सवडे हे आपल्या दुचाकीने शेतातील विद्युत मोटार बंद करून अकोला देवकडे येत होते. यादरम्यान शेतरस्त्यावरून ते टेंभुर्णी- देऊळगाव राजा मुख्य रस्त्यावर येत असताना अचानक एक चारचाकी वाहन त्यांच्यासमोर आले. त्या वाहनापासून बचाव करण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी वेगाने पुढे घेतली. तेवढयात देऊळगाव राजा येथून जाफराबादकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यानंतर नागरिकांनी तिघांना तातडीने टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्या ठिकाणी डॉक्टरांनी गजानन जाधव यास तपासून मृत घोषित केले तर गणेश सवडे हा गंभीर जखमी
असल्याने त्याला जालना येथे हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर बस चालक एस. पी. गावंडे यांनी स्वतःहून
बस टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणून जमा केली. मृत गजानन जाधव याच्या पश्चात आई, वडील,आजी,
आजोबा एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेमुळे एका होतकरू तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments