कारवार : संपत्तीच्या वादातूनएकाच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची घटना कर्नाटकातील हडवल्ली गावाजवळ शुक्रवारी घडली. याप्रकरणी भटकळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.
चौघांचे मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात आढळले
हडवल्ली गाव हे जंगल परिसरात असल्याने तेथे घरे एकमेकांपासून खूप दूर आहेत. शंभू भट्ट यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून सुमारे 50 मीटर अंतरावर आढळून आला. त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्यापासून सुमारे 25 पावले मागे आढळून आला. तर पत्नीचा मृतदेह एका बाजूला आणि सुनेचा मृतदेह दुसऱ्या बाजूला पडला होता. चौघांचेही मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.
घटनास्थळी उपस्थित मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, मृत शंभू यांचा मोठा मुलगा श्रीधर याचा आठ वर्षांपूर्वी किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला होता. श्रीधर भट्ट याची पत्नी विद्या भट्ट हिचे सासरे शंभू भट्ट यांच्याशी मालमत्तेतील वाट्यावरुन वाद होते.
मोठी सून आणि तिच्या भावावर खुनाचा आरोप
विद्या भट्टचा भाऊ विनय भट्ट याने ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्या आणि तिचे वडील यांचाही या खून प्रकरणात समावेश आहे. मुख्य आरोपी विनय घटनास्थळावरून फरार आहे. खून झाला त्यावेळी मृत राजू भट्ट यांचा सहा वर्षांचा मोठा मुलगा शाळेत गेला होता, तर त्याची तीन वर्षांची मुलगी घरात झोपली होती.ते दोघेही सुरक्षित आहेत.
घटनेची माहिती मिळताच कारवारचे एसपी विष्णुवर्धन भटकळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भटकळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्याचे आदेश दिले. भटकळचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत, ग्रामीण परिमंडळाचे पोलीस निरीक्षक चंदन गोपाळ, भटकळच्या सहायक आयुक्त ममता देवी, तहसीलदार अशोक भट्ट यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
0 Comments