पुणे: मोटारसायकलवरुन आलेले दोन चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवित असल्याचे आजवर आढळून आले आहे. परंतु, एका चोरट्याने एकट्याने एका पाठोपाठ तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचा प्रकार रविवारी दिवसभरात घडला आहे.
यातील पहिली घटना बिबवेवाडी येथील पासलकर चौकाजवळ रविवारी दुपारी १ वाजता घडली. याबाबत पर्वती दर्शन येथील एका ५२ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पतीसह मोटारसायकलवरुन घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या घरातील १७ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. परंतु, त्यांनी हे मंगळसुत्र धरल्याने त्याचा अर्धा भाग चोरट्याकडे गेला. तो घेऊन चोरटा पळून गेला.
दुसरी घटना कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील भुजबळ टाऊनशिप येथे दुपारी पावणेतीन वाजता घडली. याबाबत एका ५६ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुलीसह एका कार्यक्रमावरुन घरी जात होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्याने त्या रस्त्याच्या कडेला वाट पहात थांबल्या होत्या. तेव्हा मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ९० हजार रुपयांचे ५० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावून नेले.
तिसरी घटना कर्वे रोडवरील डेक्कन जिमखान्यावरील सावरकर चौकात दुपारी साडेतीन वाजता घडली.
याबाबत हडपसर येथील एका ३२ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आपल्या पतीसह मोटारसायकलवरुन जात होत्या.
सावरकर चौकात सिग्नल लागल्याने ते सिग्नलला थांबले होते.
त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरुन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून तो पळून गेला. या तिन्ही चोर्या एकाच चोरट्याने केल्याचा पोलिसांना संशय आहे.
0 Comments