सैन्य दलातील भावाने फसविल्याने युवकाची गळफास घेवून आत्महत्या

 


कराड | सैन्य दलात भरती करण्याचे अमिष दाखवून चुलत भावानेच 9 लाखाची फसवणूक केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कराड तालुक्यातील कोळे येथे ही घटना घडली.

याप्रकरणी सैन्यदलात असलेल्या चुलत भावावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद बाबुराव काळे (वय- 25) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी प्रदीप विठ्ठल काळे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगीतले की, कोळे येथील दयानंद याचा चुलत भाऊ प्रदीप काळे हा 2017 साली सैन्य दलात भरती झाला. त्यावेळी दयानंद पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत होता. मात्र, प्रदीप काळे याने दयानंदला सैन्यदलात भरती करतो, असे सांगीतले. त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दयानंदच्या कुटूंबियांनी प्रदीपला पैसे दिले. 7 जुलै 2022 रोजी प्रदीपने दयानंदच्या नावासह निवड यादी मोबाईलवर पाठविली. तसेच भरतीसाठी आणखी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे कुटूंबियांनी 90 हजार रुपये आॅनलाईन पाठवले. दयानंद सैन्य दलात भरती होण्याच्या आनंदात होता. तसेच तो प्रदीपला फोन करुन भरती कधी होणार, याबाबत विचारणाही करीत होता. मात्र, प्रदीपने वेगवेगळी कारणे सांगून वारंवार पैशाची मागणी केली. दयानंदच्या कुटूंबियांनी त्याच्या सांगण्यानुसार वेळोवेळी त्याला तब्बल नऊ लाख रुपये दिले. मात्र, तरीही भरतीबाबत तो कारणे सांगत होता. काही दिवसापूर्वी 3 आॅगस्ट 2022 रोजी प्रदीप त्याच्या घराच्या वास्तुशांत कार्यक्रमासाठी गावी आला असताना दयानंदच्या कुटूंबियांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी माझी अलाहाबादवरुन जम्मु काश्मिरला बदली झाली आहे, थोडे थांबा, असे प्रदीपने त्यांना सांगितले.

दरम्यान, वारंवार विचारना करुनही प्रदीप भरतीबाबत उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे दयानंदचा स्वभाव चिडचिडा बनला होता. कुटूंबिय त्याची समजूत घालत होते. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 29 नोव्हेंबर 2022 रोजी भरतीबाबत विचारणा केल्यामुळे दयानंद आणि प्रदीपचा वाद झाला. दयानंदने पैसे परत मागीतल्यावर प्रदीपने 2 लाख 90 हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच त्यानंतर प्रदीप पैशाबाबत आणि भरतीबाबत काहीही बोलला नाही. 27 जानेवारी 2023 रोजी दयानंदने प्रदीपकडे पुन्हा पैशाची मागणी केली. मात्र, त्याने वाद घालून पैसे देणार नाही, असे सांगीतले. त्यामुळे हताश झालेल्या दयानंदने 28 जानेवारी रोजी रात्री गावानजीकच्या बनवटी नावच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मृत दयानंदचा भाऊ शिवानंद काळे याने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रदीप काळे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments