सातारा - सातारा शहरालगतच्या कोडोली उपनगरातील संतोष शंकर शिर्के (सध्या रा. गिरगाव, मुंबई) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी साडेसतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 750 ग्रॅम चांदी व नऊ हजारांची रोख रक्कम मिळून आठ लाख 89 हजारांचा ऐवज चोरून नेला.
घटना दि. 14 ते 15 फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी शिर्के यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संतोष शिर्के यांचा ईंटरियर डिझायनिंगचा व्यवसाय असून, सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत. त्यांचे मूळचे घर कोडोलीतील विजयनगरमधील साक्षी रेसिडेन्सी या इमारतीत आहे. ते काही कामानिमित्त दि. 14 रोजी घर बंद करून बाहेरगावी गेले होते. ते काल (दि. 15) घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलूप आणि कडीकोयंडा तुटलेला दिसला. शिर्के यांनी तातडीने सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शिर्के यांच्यासमवेत घराची पाहणी केली असता,
कपाटातील सात तोळ्यांचे गंठण, चार तोळ्यांचा राणीहार, एक तोळ्याची कर्णफुले, एक तोळा दोन ग्रॅमचा नेकलेस, एक तोळा आठ ग्रॅमचे ब्रेसलेट, एक तोळा पाच ग्रॅमच्या अंगठ्या, एक तोळ्याचे नाणे, लहान मुलांचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने, 750 ग्रॅम चांदी आणि नऊ हजार रुपयांची रोख रक्कम, असा आठ लाख 89 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
0 Comments