सातारा जिल्ह्यातील आंबेघर भोगवली सोसायटीत ८४ लाखांचा घोटाळा

 


सातारा : जावळी तालुक्यातील आंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटीमध्ये तब्बल ८४ लाख ३९ हजार २७९ रुपयांचा घोटाळा झाला असून, याप्रकरणी सोसायटीच्या सचिवावर मेढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजित तुकाराम रांजणे (वय ४१, रा.

दापवडे, ता. जावळी, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या सचिवाचे नाव आहे.

याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबेघर (ता. जावळी) येथील आंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटीमध्ये अजित रांजणे हा सचिव म्हणून काम करत आहे. लेखा परीक्षक गणेश भीमराव पोफळे (४१, रा. वालूथ, ता. जावळी, जि. सातारा) यांनी २०२१-२०२२ या वर्षाचे या सोसायटीचे लेखा परीक्षण केले. त्यावेळी सोसायटीच्या सचिवाने तब्बल ८४ लाखांचा घोटाळा केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सचिव अजित रांजणे याने पदाचा गैरवापर करून सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज उचलले. तसेच कर्जदारांची दिशाभूल करून चलनाद्वारे कर्जदारांचे पैसे काढून घेतले.

काही सभासदांकडून कर्जाच्या वसुलीचे पैसे घेऊन बँकेत न भरता स्वत: हडप केले. एवढेच नव्हे तर कर्जदारांना बँकेची नसलेली वसुलीची चलने दिली. तसेच त्यांना कर्ज असताना कर्ज नसल्याचा खोटा दाखला दिला. सभासदांच्या येणे-देणे व्यवहाराच्या पासबुकवर खोट्या नोंदी केल्या. अशा विविध प्रकारे कर्जदारांची ८४ लाख ३९ हजार २७९ रुपयांची फसवणूक केली.

याबाबत लेखा परीक्षक गणेश पोफळे यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी सचिव अजित रांजणे याच्यावर गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे अधिक तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments