हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अपघातात कुटुंबाच्या भेटीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे.
हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ अज्ञात वाहनाने या जवानाच्या बाईकला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि जवानाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (16 फेब्रुवारी) रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. सुनील कुमारराव खरात (35, रा. मकोडी, ता. सेनगाव) असे या अपघातात निधन झालेल्या जवानाचे नाव आहे.
सेनगाव तालुक्यातील मकोडी येथील सुनील खरात हे मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते.
मागील काही दिवसांपासून ते जम्मू काश्मीर येथे आपले कर्तव्य बजावत होते.
आठ दिवसांपूर्वीच ते एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते. काल सकाळी ते हिंगोली येथून दुचाकीवर त्यांच्या गावाकडे मकोडी येथे गेले होते.
त्या ठिकाणी कुटुंबातील व्यक्तींना तसेच नातेवाइकांना भेटून दुचाकीने परत ते हिंगोलीकडे यायला निघाले.
मात्र हिंगोली ते नर्सी नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यानंतर अपघातानंतर सुनील हे रस्त्यावर जोरदार आदळले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच त्यांच्या बाईकचादेखील चुराडा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मगन पवार,
उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार किशोर पवार यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या दुर्दैवी अपघातानंतर मकोडी गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments