नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका प्रियकराने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
खळबळजनक घटना मौदा पोलिस स्टेशनअंतर्गत वॉर्ड क्रमांक 15 या ठिकाणी घडली आहे. शुभम रमेश कुहीकर (वय 28) असे आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. त्याने आत्महत्या करण्याअगोदर 'मी तिच्या त्रासाला कंटाळलो आहे. मी आत्महत्या करीत आहे. त्यांना क्षमा करू नका', अशी फेसबुक पोस्ट देखील केली होती.
मृत शुभमचे भंडारा येथील जयश्री नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी एकमेकांबरोबर लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. या प्रेम प्रकरणाची माहिती मुलीच्या वडिलांना आणि मामाला कळाली. 7 जानेवारीला जयश्रीने शुभमला घरी बोलाविले. यावेळी तिचे वडील व मामाही घरी होते. त्यांनी शुभमला मारहाण केली. तसेच त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास ठार मारेल व समाजात बदनामी करेल, अशी धमकीसुद्धा दिली. यानंतर त्यांनी शुभमच्या बॅगमधून धनादेश काढून त्यावर बनावट स्वाक्षरी केली. या सगळ्या गोष्टीमुळे शुभम तणावामध्ये राहत होता.
19 फेब्रुवारी रोजी शुभमने नेहमीप्रमाणे पूजा केली आणि त्यानंतर लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला.
त्याअगोदर त्याने आपण आत्महत्या करणार असल्याचे फेसबुकवर पोस्ट करून सांगितले.
हि पोस्ट वाचून नातेवाईक तेजराम बारापात्रे याने शुभमच्या भावाच्या मोबाइलवर संपर्क साधला.
शुभमबाबत विचारणा केली. शुभम बाहेरच्या खोलीत असल्याचे त्याने सांगितले.
शुभमने आत्महत्या करीत असल्याची पोस्ट केल्याचे तेजरामने त्याच्या भावाला कळविले. यानंतर भावाने खोलीत जाऊन बघितले असता शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मौदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांना शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी या सुसाईड नोटच्या आधारे जयश्री, तिचे वडील व मामाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
0 Comments