मागील काही दिवसांपासून मुंबईत सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे.
दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत तरुणीला गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून तिच्या वडिलांच्या खात्यातील तब्बल 99 हजार 999 गायब केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी कारवाई करुन 96 हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीची इंस्टाग्राम या सोशल माध्यमातून एका तरुणाबरोबर ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर तरुणाने गिफ्ट पाठवण्याचे लालच दाखवत ट्रॅक ऑन सर्विस कुरिअरच्या माध्यमातून गिफ्ट पाठवले. हे गिफ्ट 20 तारखेपर्यंत पोहोचेल असे त्याने सांगितले. मात्र, गिफ्ट न पोहोचल्याने तरुणीने गुगलच्या माध्यमातून ट्रॅक ऑन सर्विस या कंपनीचा नंबर सर्च करून संपर्क केला. त्यानंतर तरुणीने 92636230 या नंबरवर संपर्क केला. यावेली कुरियर संबंधित माहितीसाठी तरुणीला तीन रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र, याच वेळी तरुणीच्या वडिलांच्या खात्याची सर्व माहिती फ्रॉडरकडे गेल्यामुळं खात्यातील 99 हजार 990 रुपये अचानक खात्यातून कमी झाले. फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच तरुणीने दहिसर पोलीस ठाण्यात वडिलांसोबत जाऊन तक्रार दिली.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पोलिसांनी सायबर सेफ पोर्टलच्या माध्यमातून ट्रान्सफर झालेले पैसे आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आरबीएल बँकच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तक्रारदारास 96 हजार रुपये पुन्हा मिळवून दिले आहेत.
इंटरनेटच्या वाढत्या प्रभावासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड वाढत आहे. संगणकावरील दस्तएेवज चोरी, व्हायरसच्या माध्यमातून धोका पोहोचवणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, वैयक्तिक मर्यादांचा भंग करणे, ऑनलाइनच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणे, समाजमाध्यमांवर अश्लील छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी आणि खंडणी उकळणे आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. ऑनलाइन फसवणुकीसह सायबर गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे. इंटरनेट वापरकर्त्यांत सर्वाधिक युवकच आहेत. दरम्यान, अशा प्रकरणात आरोपींना पकडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे.
0 Comments