शेतात जावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

 


जळगाव : धानवड (ता. जळगाव) येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. 

याबाबत एमआयडीसी पोलिस  ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरत युवराज पाटील (४०, रा. धानवड, ता. जि. जळगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

धानवड येथील भरत पाटील हे परिवारासह शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी (१ फेब्रुवारी) ते शेतात गेले होते. शेतातील निंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शेजारील शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी गावातील ग्रामस्थांना माहिती दिली.

ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. रूग्णालयात लहान भाऊ आणि बहिणीने एकच आक्रोश केला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृत भरत यांच्यामागे आई देवकाबाई, पत्नी ललिता, लहान भाऊ राजेंद्र, विवाहित बहिण, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments