शेतात गवत कापणाऱया महिलेवर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे मंगळवारी घडली. बिबटय़ाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला प्राथमिक उपचारानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
शकुंतला शंकर मैड (वय 55) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
शकुंतला मैड या जनावरांसाठी चारा आणण्याकरिता घराजवळील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. या दरम्यान शेतात डबा धरून बसलेल्या बिबटय़ाने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढविला. बिबटय़ाने त्यांच्या हाताला जोरदार चावा घेत मैड यांना जखमी केले. मैड यांच्या ओरडण्यामुळे बिबटय़ा तेथून पसार झाला. मैड यांना तातडीने उपचारासाठी साकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
वनविभागाला या प्रकाराची माहिती देण्यात आली असून, परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबटय़ाला पकडण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील प्रवरा-मुळा नदीपट्टय़ालगतच्या भागात बिबटय़ांचा वावर वाढला असून, वनविभागाने बिबटय़ांना पकडून ग्रामस्थांमधील भीती घालविण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, आश्वी खुर्द शिवारात रविवारी मध्यरात्री उद्योजक राजेंद्र मांढरे यांनी घराकडे जात असताना एक बिबटय़ा मुक्तपणे वावरताना आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळेलगत बिबटय़ा वावरताना दिसत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या परिसरात शाळा असल्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठी वर्दळ व लोकवस्ती आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबटय़ा जेरबंद करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
0 Comments