भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे पतीने ८ महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने घराच्या मागील बाजूला असलेल्या जंगलात तिचा मृतदेह पुरला होता. आरोपी पतीचे नाव कल्पेश सुदाम ठाकरे (वय २६ रा. अनगांव) तर माई उर्फ मनिषा (वय २३) असे मयत पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च २०१६ रोजी कल्पेश ठाकरे याचा प्रेमविवाह मनिषासोबत झाला होता. मनिषा ही व्यवसायाने बारबाला असल्याने तिला लग्नापूर्वीच दारू व सिगारेट पिण्याचे व्यसन होते. ती ज्या बारमध्ये बारबाला म्हणून काम करायची त्या बारमध्ये आरोपी कल्पेश हा मित्रांसोबत मद्यपान करण्यासाठी जात असे त्याच ठिकाणी त्यांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. या दोघांनी बांद्रा येथे विवाह कार्यालयात नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र ऐषआरामाची सवय असलेल्या मनिषाचे सासरच्या मंडळींशी जमत नसल्याने हे दोघेही वर्षभरापासून अंबाडी येथे राहत होते.
दरम्यान मनिषा आठ महिन्यांची गरोदर राहिल्याने कुटूंबात आनंद होता. मात्र मनिषाने दारू व सिगारेटच व्यसन सोडावे तसेच यामुळे आपल्या होणाऱ्या बाळावर या व्यसनाचा दुष्परिणाम होईल असे तिला आरोपी कल्पेश वांरवार सांगत होता. यावरून दोघामध्ये भांडणेही व्हायची. तरीही ती कल्पेशकडे दारू, सिगारेटची मागणी करायची.
अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून कल्पेश याने 9 मार्चच्या रात्री पत्नी माही हिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर एक रात्र मृतदेह घरात ठेवून घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरला. त्यानंतर पोलिस व मनिषाच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी कल्पेश याने शक्कल लावून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार १२ मार्चला गणेशपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने 8 महिन्याची गरोदर असलेल्या मनिषाचा शोध पोलिस घेत होते. आरोपी कल्पेश हा पोलिस ठाण्यात वारंवार जावून बेपत्ता पत्नीची चौकशी करीत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यावेळी पोलिसांनी मनिषाच्या आईवडिलांशी संपर्क केला असता तिचा मोबाईल ९ मार्चपासूनच बंद येत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कल्पेश याला ताब्यात घेवून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात पुरल्याची कबुली दिली.
दरम्यान मनीषाचे पुरलेले प्रेत बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी पती कल्पेशला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
0 Comments