रानडुकराच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार

 


ठाणे : या दोन्ही घटना मुरबाड तालुक्यात घडल्या असून, तीन दिवसांपूर्वीच किसळ गावच्या हद्दीत राहणाऱ्या हरेश पारधी या तरुणावर रानडुकराने केलेल्या हल्ल्यात छातीत गंभीर दु़खापत होत, दुर्दैवी मृत्यू झाला. तर या गावालगत असलेल्या साखरे (धारगांव) येथील शेतकरी मारुती दाजी पवार (५५) यांच्यावर रानडुकराने हल्ला करीत अक्षरशः त्यांना फाडून गंभीर जखमी केले असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मारुती दाजी पवार हे गावालगत असलेल्या आपल्या शेतावर आज सकाळी गेले होते. त्यावेळी शेतातील भाताचे पेंढे ठेवलेल्या खळ्यात लपून बसलेल्या गावठी रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्याच्या पायाचे अंगाचे लचके तोडत, तोंडावर गंभीर जखमा करीत सर्वांगावर चावा घेऊन गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नातेवाईकांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांच्या तोंडावर व शरीरावर डॉक्टरांनी असंख्य टाके टाकून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

मुरबाड तालुक्यात भीमाशंकर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड या तीन अभयारण्यांच्या हद्दीत ७५ गावपाडे आहेत. या अभयारण्यात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात, सर्वत्र "जंगलराज" सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या अरण्यात एका बाजूला शासन वनिकरणाच्या नावाखाली त्याच त्याच खड्ड्यात कोट्यवधींची वृक्षलागवड मोहीम राबवत आहे. त्यामुळे या अभयारण्य क्षेत्रात वाढती वृक्षतोड, पाण्याचा तुटवडा, जंगलांचे सपाटीकरणामुळे माळराण झाल्याने व वन्य प्राण्याच्या अस्तीत्वावरच घाला घातला गेल्याचे दिसून येत आहे.

वन्यप्राण्यांची अन्नाविना उपासमारी सुरू झाली असून, जंगली प्राण्यांना खाण्यासाठी काहीही उपलब्ध नसल्याने वन्यप्राणी माकडे, हरीण, भेकरं, ससे, रानटी- डुक्कर, निलगाय इत्यादी प्राणी गाववाड्या वस्तीकडे अन्न व पाण्याच्या शोधात येतात. तर या प्राण्यांचा माग काढीत वाघ, लांडगे, तरस, बिबट्यासारखे हिस्त्रप्राणीदेखीस गाववाड्या-पाड्यालगत येऊ लागले आहेत.

दरम्यान, याच परिसरात जुलै महिन्यापासून चार बिबट्यांचा वावर असून, यात नरमादीसह दोन बचड्यांचा समावेश असल्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. परंतु, या परिसरात सध्या "जंगलराज" सुरू असून, संगम गाव ते उमरोली या परिसरात डोईफोडी नदीलगत जंगल व पाण्याची सोय असल्याने वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. अधून-मधून त्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत असल्याचे गावकरी सांगत आहेत.

 वनप्राण्यांच्या भीतीपोटी परिसरातील नागरिक दिवसादेखील शेतावर जाण्यास भीत आहेत. या परिसरात एक प्रकारे अघोषित संचारबंदीच या प्राण्यांमुळे लागल्याने गावकरी कायम भीतीच्या सावटाखाली दिवस काढीत आहेत. तर रात्रीच्या वेळेस बाहेर जाण्याचे धाडस कोणीसुद्धा करीत नाही. मा़त्र, वनविभागाला याच काहीच सोयरसुतक असल्याचे दिसून येत नाही, असा आरोप रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्याच्या नातेवाईकांनी केला आहे.


Post a Comment

0 Comments