विहिरीच्या पाण्यात बुडून दोघां भावांचा दुदैवी मृत्यु

 


लातूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दोन भावांचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विहिरीत पाणी काढण्यासाठी उतरलेला भावाला बुडताना पाहून काठावर असलेल्या भावाने मदतीसाठी हात दिला मात्र दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

मन हेलावून टाकणारी घटना देवणी तालुक्यातील हंचनाळ शिवारात घडली आहे. नरसिंग युवराज चव्हाण आणि संगमेश्वर संजय चव्हाण अशी मृत पावलेल्या दोन्ही भावांची नावे आहेत. 

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील हंचनाळ शिवारातील रसिका महाविद्यालयाच्या पाठीमागील रमेश बिरादार यांचं शेत आहे. या शेतामध्ये पाण्याने भरलेली विहीर आहे. या विहिरीचं पाणी आणण्यासाठी देवणीतील चुलत भाऊ नरसिंग चव्हाण आणि संगमेश्वर चव्हाण हे दोघे भाऊ गेले होते. पाणी काढण्यासाठी नर्सिंग विहिरीत उतरला. यादरम्यान त्याचा अचानक तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे नरसिंग बुडू लागला. आपला भाऊ आपल्या डोळ्यादेखत बुडत असल्याचे पाहून संगमेश्वरने क्षणाचाही विलंब न करता बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचाही तोल गेला अन् तोही पाण्यात पडला आणि दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच या मुलाचे कुटुंबीय आणि देवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांच्यावर देवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देवणी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश उस्तुर्गे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एकाच घरातील दोन तरुण भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments