बोटा: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर येथे इमारतीवर काम करताना विजेचा धक्का बसल्याने डोक्यावर खाली पडल्याने पस्तीस वर्षीय बांधकाम व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.
16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12ः30 वाजेच्या सुमारास घडली. मोहन भिवाजी मोरे (वय 35 वर्षे, रा. चितळकर वस्ती साकुर, ता. संगमनेर) असे मृताचे नाव आहे.
गुरुवारी दुपारी साकूर येथील वनवे नगर मधील जावेद अब्दुल शेख यांच्या इमारतीवर काम करताना बांधकाम व्यावसायिक मोहन मोरे यांचा विद्युत वाहक तारेच्या मेन लाईनला धक्का लागल्याने विजेचा त्यांना जोरदार झटका बसला.
यात ते इमारतीवरुन खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कॉटेज हॉस्पिटल संगमनेर येथे उपचारासाठी दाखल केले, परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे बंधू सुखदेव भिवाजी मोरे यांच्या खबरीवरून घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश लोंढे करीत आहेत.
0 Comments