तब्बल 22 लाखांची रोकड पळवली

 


मुंबई येथे सोने खरेदीचा लिलाव न निघाल्याने सोबत असलेली 22 लाखांची रोकड घेऊन कर्नाटककडे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून व्यापारी परत जात असताना त्यांची रोकड चोरण्यात आली.

मंगळवारी (दि. 7) रात्री नऊच्या सुमारास हा घटना घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारकडे जात असताना हॉटेल अमृता गार्डन (सारोळा, ता. भोर) येथे चहा-नाष्ट्यासाठी बस थांबली होती. दरम्यान, बसमध्ये ठेवलेल्या बॅगेतून 22 लाख रोकडची चोरी झाली.

याप्रकरणी सोन्याचे व्यापारी राजेंद्र पवार (रा. मंगळुरू, कर्नाटक) यांनी कॅनरा पिटी या खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स (केए 19 एडी 0966) मधील साफसफाई करणार्‍या दोन चालकांसह (नाव-पत्ता माहीत नाही) तिघांवर राजगड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. 13) फिर्याद दिली आहे. राजेंद्र पवार यांनी मुंबईमध्ये होणार्‍या लिलावातील सोने खरेदीसाठी त्यांचा कामगार स्वरूपसिंगला मंगळुरूहून बुधवारी (दि. 1) रोख रक्कम 22 लाख घेऊन पाठविले होते. मात्र, लिलाव न निघाल्यामुळे सोने खरेदी करता आले नाही.

परिणामी, स्वरूप मुंबई येथून बसने प्रवास करीत असताना महामार्गालगत असलेल्या हॉटेल अमृता येथे बस थांबली होती. बसमधून सर्व खाली उतरले होते. मात्र, बसमध्ये दोन चालक व कचरा साफसफाई करणारा कामगार होता. बसमध्ये आल्यानंतर स्वरूपने बॅग तपासली असता रोकडची चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत स्वरूपने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत का? अशी विचारणा केला असता बसमधील साफसफाई करणारा कामगार व चालक यांनी दमदाटी केली. अखेर पवार यांनी (मूळ गावी चार दिवस यात्रा असल्याने) सोमवारी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली.


Post a Comment

0 Comments