पोलिसांनी 37 वर्षीय व्यक्तीची आपल्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणली आहे. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तरुणाने आपले कुटुंब सोडून मुंबईत भीक मागायला सुरुवात केली.
एका रिपोर्टनुसार, हा तरुण केरळमधून आपले घर आणि कुटुंब सोडून एक वर्षापूर्वी एका महिलेच्या शोधात मुंबईत पोहोचला होता. या तरुणाची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या महिलेशी ओळख झाली. पोलिसांचे म्हणणे आहे की, हा तरुण मुंबईत आल्यानंतर या महिलेला भेटला. पण पहिल्या भेटीनंतर महिलेने नातं तोडलं.
मन दुखावल्यानंतर तो तरुण डिप्रेशनमध्ये गेला आणि घरी परतलाच नाही. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, त्यानंतर हा तरुण घरी परतला नाही आणि मुंबईत भीक मागू लागला. मुंबई पोलिसांनी भीकविरोधी मोहिमेदरम्यान त्याला पकडले. आधार कार्डद्वारे त्याची संपूर्ण माहिती काढण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कोल्लम करुणागप्पल्ली येथील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचं नाव अनूप राजशेखरन असं आहे.
अनूपने एक्वा कल्चर आणि फिशरीज सायन्समध्ये मास्टर्स पूर्ण केले आहे. तो जानेवारी 2022 पासून बेपत्ता होता. नोकरीच्या शोधात जात असल्याचे पालकांना सांगून हा तरुण मुंबईत आला, मात्र परत आलाच नाही. 18 मार्च रोजी जुहू पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने एका भिकाऱ्याला पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी त्याला पत्ता विचारला. त्यानंतर त्याने पोलिसांना आपले कुटुंब नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या बॅगची झडती घेतली असता एक आधारकार्ड आणि मल्याळममध्ये लिहिलेले पत्र सापडलं.
पत्रात लिहिलेला पत्ता तपासल्यानंतर पोलिसांनी केरळमधील करुणागपल्ली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचे रेकॉर्ड तपासले. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, जुहू पोलिसांनी केरळ पोलिसांना अनूपचा फोटोही पाठवला होता. जुहू पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षकाने अनूपच्या कुटुंबाचा शोध घेतला आणि त्यांचे तपशील त्याचे वडील राजशेखरन कुटपन यांच्याशी शेअर केले. यानंतर कुटुंबीयांशी भेट झाली.
0 Comments