दहावीच्या निरोप समारंभाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत नदीत पोहायला गेला, मात्र घरी परतलाच नाही!

 


कराड  : दहावीच्या विद्यार्थ्याचा कोयना नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराडमध्ये घडली आहे. शनिवारी दहावीचा निरोप समारंभ झाला आणि रविवारी राहुलने कायमचा निरोप घेतला.

राहुल परिहार असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राहुल कराड आगाशिवनगरचा रहिवासी होता. तीन दिवसानंतर कोयना नदीपात्रातून राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मित्रांसोबत कोयना नदीत पोहायला गेला होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथे राहणारा राहुल गणेश परिहार हा मलकापूर कराडच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. राहुल रविवारी दुपारी कोयना नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहताना तो बुडाला. यावेळी नदीत पोहणाऱ्या इतर मुलांनी राहुल बुडत असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ त्याच्या घरी जाऊन राहुल बुडाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

तीन दिवसांनी मृतदेह सापडला

यावेळी राहुलच्या कुटुंबीयांनी नदीपात्राकडे धाव घेऊन राहुलचा शोध घेण्याचे काम सुरू केले. मात्र रविवारी नाही, सोमवारीही राहुल सापडला नाही. पोलिसांसह नातेवाईक नदीपात्रात त्याच्या मृतदेहाचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी सा़यंकळी कोयना पुलाखाली नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला.

राहुल परिहार हा नदीपात्रात बुडाल्याची घटना समजताच आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर आणि आगाशिवनगर परिसरात शोककळा पसरली. राहुलच्या शाळेत शनिवारी निरोप समारंभ पार पडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी राहुल कोयना नदीवर मित्रांसोबत पोहायला गेला तो परतलाच नाही. राहुलच्या मृत्यूमुळे परिहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments