जागतिक महिला दिनाला पुण्यात गालबोट, दोन महिलांनी केली आत्महत्या

 


  दौंड :बुधवारी जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो.

पुण्यात महिला दिन उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे दौंड तालुक्यात दोन महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. नेमकं जागतिक महिला दिना दिवशीच दोन महिलांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या दोन्ही घटना घडल्या आहेत. यमुना हनुमंत कारंडे आणि पूनम बाळासाहेब टेकवडे  (वय-22 रा. कासुर्डी ता. दौंड, जि. पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या दोघींची नावे आहेत. या दोघींच्या आत्महत्येचे  कारण समजू शकले नाही.

यमुना कारंडे यांचा मृतदेह पारगाव येथील शेतकरी सयाजी ताकवणे यांच्या शेतातील विहिरीमध्ये आढळून आला.
या संदर्भात त्यांचे पती हनुमंत कारंडे यांनी यवत पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
यमुना कारंडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. यमुना कारंडे या रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय पाटस व जय मल्हार विद्यालय देलवडी येथे क्लार्क म्हणून काम करत होत्या.

दुसरी घटना दुपारी कासुर्डी गावाच्या हद्दीत घडली आहे.
पूनम टेकवडे या तरुणीने घरात लोखंडी पत्र्याचे अँगलला साडीने गळफास  घेऊन आत्महत्या केली.
याबाबत लक्ष्मण बजाबा खेनट यांनी यवत पोलिसांना माहिती दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


Post a Comment

0 Comments