शिरूर (जि. लातूर) : तालुक्यातील थेरगाव येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.
दिलीप शिंदे-पाटील (वय ५८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले की, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथील शेतकरी दिलीप बाजीराव शिंदे-पाटील यांनी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे दाेन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दरवर्षी सततची नापिकी आणि शेतमालाचा घसरत असलेला बाजारभाव यामुळे हे कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न सतत त्यांना सतावत हाेता.
डाेक्यावर असलेला कर्जाचा डाेंगर दिवसेंदिवस वाढतच हाेता. आता या कर्जाची कशी परतफेड करायची? या आर्थिक विवंचनेतून साेमवारी त्यांनी स्वत:च्याच शेतात विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, त्यांना उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत शिरूर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0 Comments