मुंबई, : दोन वर्षांपूर्वी एका रात्री बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा लेक आर्यनला मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली. या बातमीनं बॉलिवूड जगतात खळबळ माजली.
पण या प्रकरणात आर्यनला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा झाली. त्यांचं नाव होतं समीर वानखेडे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकरचे हे पती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रसिद्धीझोतात आले.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप चर्चा झाली. या प्रकरणात क्रांती रेडकरने आपल्या नवऱ्याला खंबीर साथ दिली. आता हे सगळं प्रकरण मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'अमर उजाला'ने दिलेल्या वृत्तानुसार आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आता बायोपिक बनणार आहे.
वर्षअखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक 'मैं अटल हूं'च्या निर्मात्यांपैकी एक असलेला झीशान अहमद मुंबईत NCB अधिकारी म्हणून तैनात असलेल्या समीर वानखेडे यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाच्या लेखन टीममध्ये टीव्ही पत्रकार निधी राजदानचाही समावेश असून समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संवादावर या चित्रपटाचं कथानक आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.याविषयी अधिक माहिती देताना समीर वानखेडे यांचा बायोपिक लिहिणारे प्रीतम झा म्हणाले कि, 'या चित्रपटात वानखेडे यांच्या आयुष्याशी संबंधित ते पैलू दाखवण्यात येणार आहेत जे आजही लोकांना माहिती नाहीत.
चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या कास्टिंगचे काम सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. समीरच्या भूमिकेसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांशी बोलणी सुरू असून, चित्रपटाचे स्क्रिप्टिंग पूर्ण झाल्यानंतर कोणाला फायनल केले जाईल, हे सांगितले जाईल' असं ते म्हणाले आहेत.
0 Comments